Wednesday 17 December 2014

गीता फौंडेशन

"गीता फौंडेशन" असे नोंदणीकृत विद्यापीठ नाही किंव्हा अशी संस्था नाही. परन्तु त्याप्रकारे आणि साधारण: त्या प्रकारचे कार्य चालते. कार्यास प्रेरणा मिळावी,शिस्त्बाधता यावी, सर्वांचा सहभाग वाढावा यासाठी हे नामकरण. 
सन २००६ मध्ये या फौंडेशन चे कार्य सुरु झाले. कार्य म्हणजे काय तर प्रामुख्याने आपल्या संस्कृती चा, धार्मिक ग्रंथांचा अधिकाधिक प्रसार व प्रचार. या प्रसारासाठी संस्थेने "धर्मयज्ञ" नावाचे मासिक सुरु केले जे आजही दर महिन्याला श्री. प्रफुल्ल डबीर यांच्या "प्रज्ञा प्रिंटींग प्रेस", कोल्हापूर येथून प्रकाशित होते. ऑक्टोबर २०१४ पासून "धर्मयज्ञ" बरोबरच "गीता गुरुकुल" नावाचे मासिक देखील प्रकाशित होते. ज्या मार्फत शालेय मुलांना आपले सांस्कृतिक ग्रंथ (भगवतगीता, भागवत इत्यादी) विषयी माहिती दिली जाते. मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आवश्यक असलेले सर्व या मासिक मार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवले जाते. 
 
नियमित मासिक व्यतिरिक्त "गीता फौंडेशन" या संस्थेने इतरही पुस्तके प्रकाशित केलेली आहेत (जसे गीता सार; विष्णूसहस्त्रनाम; इत्यादी). 
 
पुस्तक प्रकाशना बरोबरच संस्था गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देखील करते. अनेक हुशार विद्यार्थी केवळ आर्थिक पाठबळ नसल्याने उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत. अशा विद्यार्थ्यांना मदतीचा हात (कुठलीही परतफेड न मागता) संस्था देते. 
 
आजवरचे संस्थेचे सारे कार्य हे त्या नारायणच्या आशीर्वादानेच यशस्वी झाले, या पुढेही होत रहावे हीच प्रार्थना. 
 
श्रीकृष्ण शरणं मम 
 
आपला सुहृदय 
आपटे काका 
      
 

Friday 28 November 2014

कलिसंतरणोपनिषद्‌

कलियुगात तरून जाण्याचा उपाय या उपनिषदात सांगितला आहे परंतु आपल्या मनात येणारा पहिलाच प्रश्न  कलि म्हणजे कोण ? कलियुग कोणते ? कलियुग केव्हा चालू झाले, त्याचा काल किती वर्षांचा, त्या युगाच्या समाप्तीनंतर काय इत्यादी इत्यादी प्रश्नांची उत्तरे म्हणजे केवळ माहिती (informantion) होय भागवतात कलियुगाची लक्षणे सांगितली आहेत, पैकी एकच श्लोक पाहू
            वित्तमेव कलौ नृणां जन्माचारगुणोदयः ।
            धर्मन्यायव्यवस्थायां कारणं बलमेव हि  ॥ भाग १२..
            ‘कलियुगामध्ये ज्याच्याकडे धन संपत्ती असेल त्यालाच लोक कुलीन म्हणतील, सदाचारी म्हणतील, सद्गुणी मानतील धर्म आणि न्याय यांच्याबाबतीत शक्ती प्रभावी ठरेल
            अन्य पण काही लक्षणे सांगितली आहेत जसे की  पैशाशिवाय न्याय मिळू शकणार नाही, बोलण्यातील चातुर्य हेच पांडित्य समजले जाईल गरिबी हे दुर्जनत्वाचे लक्षण असेल आपले पोट भरणे हाच मोठा पुरुषार्थ असेल व ठासून बोलण्यालाच सत्य मानले जाईल इत्यादी इत्यादी अशी स्थिती आहे ना ?
      सारांश  मी वर्तमानपत्र वाचल्यावर ज्यामुळे हळहळतो ते कलियुग दूरदर्शनवर स्त्रीचे आचार/विचाराचे जे अधःपतन दाखवले जाते ते कलियुग भ्रष्टाचार हा शिष्टाचार झाला आहे, हे कलियुग पुरुषांची स्त्रीकडे बघण्याची जी (धाडसी) नजर, ते कलियुग कायदा/शास्त्र न पाळण्याची वृत्ती म्हणजे कलियुग
            तुमच्या डोळ्यांना वाचून व माझ्या हाताला लिहून अपवित्रता देणे पुरे सर्वप्रथम म्हणजे या कलियुगात, या वृत्तीत, विचारात, मानसिकतेत मी कुठे बसतो ? माझे सर्व जीवन पैशाभोवतीच फिरते का ? मी धर्माचरण करतो का ? मी सत्यनिष्ठ आहे का ? माझ्या वृत्तीसुद्धा कलियुगाशी मिळत्याजुळत्या आहेत का ?
            असे जरी असले तरी मला या कलियुगातच रहावयाचे आहे, आणि कलिप्रवृत्तीपासून परावृत्त पण व्हायचे आहे याला काही उपाय आहे का ? एक उदाहरण पाहू, एक दृष्टांत पाहू
            श्रुतींमध्ये एक मार्मिक उदाहरण आहे सर्व पृथ्वी काट्यांनी भरली आहे त्या पृथ्वीवर चालणे खूप अवघड झाले आहे तर मग सर्व पृथ्वीवर चामड्याचे आवरण घालणे हा त्यावर उपाय ठरेल का? नाही त्यावर उत्तम इलाज म्हणजे स्वतःचेच पाय चामड्याने झाकून टाकले म्हणजे झाले ! त्याचप्रमाणे कलियुग बदलावे, जगाने सुधारावे असे म्हणणे चुकीचे ठरेल यावर उत्तम इलाज म्हणजे मी माझ्या वृत्ती, विचार, आचार, निष्ठा, प्रेयाकडून श्रेयाकडे नेल्या पाहिजेत . 'If I change, the whole world shall change, will have to change'  यावरसुद्धा एक युक्तिवाद मांडला जातो कलियुगात समाज इतका बिघडला आहे की दुप्रवृत्त लोकांत मी एकट्यानेच सत्प्रवृत्त राहून चालत नाही प्रवाहाविरुद्ध पोहणे खूप अवघड असते
            तरुणांनो, या संदर्भात मी तुमच्यापुढे दोन उदाहरणे ठेवतो इन्फोसिसचे श्री नारायणमूर्ती केवळ रु १० हजार घालून त्यांनी कंपनी चालू केली म्हणजे अतीसामान्य व्यक्तिमत्त्व पण आज ते जगन्मान्य आहेत ते काय म्हणाले माहीत आहे ? ‘मी आयुष्यात अनैतिक मार्गाने एक रुपया दिला नाही किंवा घेतला नाहीतरी पण ते मोठे झालेच ना ?
            दुसरे उदाहरण डॉ होमी भाभांचे १९ वर्षांचे असताना केंब्रिजमध्ये शिकत होते त्यावेळी सर्व कुटुंबीयांचा आग्रह की त्याने शिक्षण पूर्ण झाल्यावर टेल्कोची धुरा सांभाळावी, पैशात खेळावे, सत्ता उपभोगावी, कंपनी मोठी करावी इत्यादी त्यांच्या मनात मात्र (आपल्या सारख्यांच्या दृष्टीने दळिद्री) विचार की, , 'I am dying for Physics. I want to devote my life for Physics.' काय झाले ? न प्रयत्न करता सत्ता, धन, मोठेपणा मिळालाच ना ? अणुऊर्जेबाबत देश सदैव त्यांच्या ऋणात आहे, राहील दोघेही प्रवाहा विरुद्धच वागले ना ? त्यांना ते शक्य झालेच ना !
            कायदा करून भागत नाही खरी गरज आहे ती कायदा पालन करणाऱ्या वृत्ती जोपासण्याची जीवन उत्तम प्रकारे कसे जगावे त्याबाबतचे आचारशास्त्र (म्हणजे कायदा) गीतेत आहेच पण आपण कितीजण (तो कायदा पाळतो ?) त्याप्रमाणे आचरण करतो? आपली तशी वृत्ती नाही तेव्हा ही वृत्ती निर्माण करण्याचा उपाय कोणता ? कलियुगातील दुष्प्रभावापासून स्वतःला वाचविण्याचा, अनैतिक समाजात राहूनसुद्धा नीतिमान राहण्यासाठीचा मार्ग कोणता ? हा प्रश्न माझ्या मनातील नाही देवर्षि नारदांनी पितामह ब्रह्माजींना हा प्रश्न केला आणि ब्रह्माजींनी त्या प्रश्नाचे जे उत्तर दिले, जो उपाय सांगितला ते कलिसंतरणोपनिषद्‌
      
      कलिसंतरणोपनिषद्‌ तीन मंत्रांचे अत्यंत छोटे उपनिषद कृष्णयजुर्वेदाशी संबंधित या उपनिषदात हरिनामाची महती सांगितली आहे म्हणूनच त्याचे आणखी एक नाव हरिनामोपनिषदकलियुगातील दुष्प्रभावापासून स्वतःला वाचवण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे भगवन्नाम त्यामुळे माणसाच्या सर्व वृत्तीच पालटतात
 ॥  शान्तिपाठ  ॥
ॐ सह नाववतु। सह नौ भुनक्तु। सह वीर्यं करवावहै
तेजस्वि नावधीतमस्तु। मा विद्विषावहै
ॐ शान्ति ! शान्तिः !! शान्तिः !!!
द्वापरान्ते नारदो ब्रह्माणं जगाम कथं भगवन्‌ पर्यटन्कलिं संतरेयमिति
स होवाच ब्रह्मा साधु पृष्टोऽस्मि सर्वश्रुतिरहस्यं गोप्यं तच्छृणु येन कलिसंसार तरिष्यसि
भगवत आदिपुरुषस्य नारायणस्य नामोच्चारणमात्रेण निर्धूतकलिर्भवति १ ॥हरि ॐ ! 
      द्वापार युगाचे अंती नारद पितामह ब्रह्माजींजवळ गेले आणि म्हणाले, ‘भगवन्‌, मी भूलोकामध्ये भ्रमंती करत असताना कोणत्या प्रकारे कलिकालापासून स्वतःची सुटका करून घेऊ शकतो?’ त्यावर ब्रह्माजी म्हणाले, ‘वत्स्‌! तू मला (लोककल्याणार्थ) खूप चांगला प्रश्न विचारलास आज मी तुला सर्व श्रुतींचे रहस्य सांगतो, ऐक त्यामुळे कलियुगातील दोषापासून सुटका करून घेता येईल भगवान आदिपुरुष नारायणाच्या केवळ नामोच्चाराने मनुष्य कलियुगातील दोषांचा नाश करू शकेल.
नारदः पुनः पप्रच्छ तन्नाम किमिति । 
स होवाच हिरण्यगर्भः ।
हरे राम हरे राम राम राम हरे हरे ।
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।
इति षोडशकं नाम्नां कलिकल्मषनाशनम्‌
नातः परतरोपायः सर्व वेदेषु दृष्टते ।
इति षोडशकलावृत्तस्य जीवस्यावरणविनाशनम्‌ ।
ततः प्रकाशते परं ब्रह्म मेघापाये रविरश्मिमण्डलीवेति  ॥ २ ॥
त्यावर नारदांनी पुन्हा विचारले  पितामह ! ते नाम कोणते ? त्यावर हिरण्यगर्भ ब्रह्माजी म्हणाले,
हरे राम हरे राम राम राम हरे हरे
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे  ॥
            हे षोडशअक्षरी नाम कलि (वृत्तीच्या) सर्व पापांचा नाश करते यापेक्षा अन्य कोणताही श्रेष्ठ उपाय वेदातही सांगितलेला नाही या षोडश अक्षरांद्वारे जीवावर ज्या षोडश कलांची आवरणे आहेत ती नष्ट होतात ज्याप्रमाणे ढगांच्या (आवरणाच्या) नष्ट होण्याने सूर्याची किरणे प्रकाशमान होतात, त्याचप्रमाणे (अंतरंगातील) परब्रह्माचे स्वरूप दीप्तिमान होते
पुनर्नारदः पप्रच्छ भगवन्कोऽस्य विधिरिति ।
तं होवाच नास्य विधिरिति ।
सर्वदा शुचिरशुचिर्वा पठन्ब्राह्मणः
सलोकतां समीपतां सरूपतां सायुज्यतामेति ।
यदास्य षोडशीकस्य सार्धत्रिकोटीर्जपति तदा ब्रह्महत्यां तरति ।
तरति वीरहत्याम्‌ । स्वर्णस्तेयात्पूतो भवति ।
पितृदेव मनुष्याणामपकारात्पूतो भवति ।
सर्वधर्मपरित्यागपापात्सद्यः शुचितामाप्नयात्‌ सद्यो मुच्यते
सद्यो मुच्यत इत्युपनिषद्‌’’  ॥ ३ ॥
            देवर्षि नारदांनी पुन्हा विचारले, ‘भगवान ! याच्या जपाचा विधी कोणता ?’ ब्रह्माजी म्हणाले, ‘याला कोणताही विधी नाही पवित्र किंवा अपवित्र पैकी कोणत्याही अवस्थेत असताना याचा जप करणाऱ्याला सालोक्य, सामीप्य, सारुप्य व सायुज्य या चारी मुक्ती (अवस्था) प्राप्त होतात या १६ अक्षरांच्या नामाचा साडे तीन कोटी जप केल्यास जपकर्ता ब्रह्महत्येच्या आणि वीरहत्या (त्या सारख्या) महान पापातून निवृत्त होतो सोन्याच्या चोरीचे पाप जाते पितर, देवता आणि मनुष्यांच्या अपकाराच्या दोषातून निवृत्ती मिळते जपकर्ता लवकर मुक्त होतो, लवकरच (बंधन) मुक्त होतो असे हे उपनिषद्‌ ॥
कृष्णयजुर्वेदीय कलिसंतरणोपनिषद्‌ समाप्त ॥
ॐ सह नाववतु। सह नौ भुनक्तु। सह वीर्यं करवावहै।
तेजस्वि नावधीतमस्तु। मा विद्विषावहै।
ॐ शान्ति ! शान्तिः !! शान्तिः !!!

Wednesday 15 October 2014

दीपावली युक्ताहार-2014

 सादर नमस्कार !!
मला, इन्सुलिन घेणे आवश्यक असलेला मधुमेह आहे आणि तरी मी ते घेतले नाही तर काय होईल? मुलगा जर वडिलांना म्हणाला, मी आज शाळेत गेलो नाही तर काय होईल? वडील बायकोला म्हणाले, मी आज ऑफिस ला गेलो नाही तर काय होईल?मी आयकर भरला नाही तर काय होइल?
असे अनेक प्रश्न आहेत आणि वरकरणी विचार केला तर त्याची उत्तरं म्हणजे -- "काहीही होणार नाही". पण हे बरोबर उत्तर नाहि. एक दिवस शाळेत गेले नाही तर काही होत नाही पण शाळेत न जाण्याची सवय झाली तर चालेल का? नाही चालणार. 
अगदी याच भूमिकेतून -- मी शास्त्राभ्यास केला नाही, करणार नाही असे जर तरुण वयात (म्हणजे ३०-३५ वयानंतर) म्हटले तर चालेल का? वरवर विचार करता काही फरक पडणार नाही. पण आयुष्यभराचा विचार करता फार मोठे नुकसान होईल. 
मला वाटते मुद्दा पटवून देण्यासाठी एवढे विवेचन पुरे. एवढ्या या छोट्या प्रस्तावाने नंतर माझा आता आपणास प्रामाणिक आग्रह:
सोबतचा दीपावली युक्ताहार घ्या. म्हणजेच कैवाल्योपानिषदावरील लेख वाचा. अवघड वाटेल, माझ्यासाठी तो नाही असे वाटेल, समजणार नाही असे वाटेल तरीही वाचा. सवडीने वाचा. तुम्हाला निश्चित पटेल. वाचून झाल्यावर, माझ्या geetafoundation@gmail.com वर प्रतिसाद द्या. तुमच्या आप्त-मित्र-परिचितांना हा लेख फॉरवर्ड करा. 
धन्यवाद. श्रीकृष्ण शरणं मम!
आपला सहृदय